चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली. जिल्ह्यातील ११ पैकी फक्त एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणूकच भाजपला जिंकता आली. त्याचे खापर सुधीर मुनगंटीवारांनी पक्षावर फोडले. त्यानंतर भाजपतील सुप्त संघर्ष बाहेर आला. बावनकुळे आणि मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. त्यावरूनही मुनगंटीवारांनी सुनावले आणि राज्यभर दौरा करणार असल्याचे म्हटले. पण, आता त्यांनी हा दौरा गुंडाळला आहे. आता तो विषय संपला आहे, असे सांगत मुनगंटीवारांनी त्यावर पडदा टाकला.
नागपूरमध्ये माध्यमांशी सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. राज्यभर दौरा करणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, राज्यभर दौर्याचा तो विषय आता संपला. आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा होईल. काही नेत्यांशी भेटतोय.चंद्रपूरमधील पराभवाबद्दल पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या संदर्भात मुनगंटीवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. आज (२३ डिसेंबर) सुधीर मुनगंटीवार यांची भाजपच्या नेत्यांसोबत मुंबईत चर्चा होणार आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये येणार आहेत.
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा मुंबईत जीव
सुधीर मुनगंटीवार ठाकरे बंधु एकत्र येण्याबद्दल म्हणाले, दोन भाऊ एकत्र यावेत अशा आमच्या सदिच्छा आहे. दोन सख्खे भाऊ आहेत. मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे. जेव्हा मुंबईमध्ये जीव आहे, तेव्हा जे जे प्रयत्न त्यांना करता येतील, ते ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचे पक्ष करणार आहेत.
प्रत्येकजण परिस्थितीनुरुप निर्णय घेतो. आता भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही जिथे शक्य आहे, तिथे एकत्र लढतोच आहे. मला वाटतं की, त्या शहराच्या शक्तीच्या, संघटनेच्या आधारावर तिथं असणार्या कार्यकर्त्यांच्या इच्छा लक्षात घेऊन युती, महायुती, महाविकास आघाडीत होते, अशी भूमिका मुनगंटीवारांनी महायुती एकत्र लढण्याच्या मुद्द्यावर मांडली.
मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का?
दरम्यान, या सगळ्या राजकीय वादावर बोलताना भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे.
सुधीरभाऊ, नाथाभाऊंच्या (एकनाथ खडसे) मार्गावर चालले आहेत का? असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून होत आहे. देवेंद्र फडणवीसांची अशी बिलकूल इच्छा नाहीये. देवेंद्र फडणवीसांवर सुधीर मुनगंटीवारांना श्रद्धा, सबुरी ठेवणे गरजेचे आहे. त्यामधून मार्ग निघेल. ते वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव पाहून पक्षातील वरिष्ठ त्यांच्यावर मेहेरनजर ठेवतील, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.